सांगोला (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अस्तित्व संस्थेच्या वतीने आपुलकी प्रतिष्ठानला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट देण्यात आली, या मशीनचा लोकार्पण सोहळा आपुलकी सदस्यांच्या उपस्थितीत मंगळवारी करण्यात आला.
सांगोला शहर व तालुक्यातील गरजू रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळावा म्हणून आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने स्व.सुलभा सबनीस यांचे स्मरणार्थ "अमेरिकन अल्बम" ( तू भेटसी नव्याने) या नाटकाच्या निर्मात्या भाग्यश्री देसाई यांनी दिलेल्या ५ लाख रुपये देणगीतून ४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करण्यात आल्या असून त्यात आणखी एका मशीनची भर पडली आहे. अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे यांनी आपुलकी प्रतिष्ठानला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अनुसंधान ट्रस्ट साथी पुणे या संस्थेच्या सहकार्याने आणखी एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट दिली.
यावेळी बोलताना शहाजी गडहिरे म्हणाले की, गेल्या ३० वर्षांपासून अस्तित्व संस्थेचे सामाजिक कार्य चालू आहे. सामाजिक कार्य करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. सांगोला तालुक्यात आपुलकी प्रतिष्ठान संस्थेचे लोकवर्गणीतून चालू असलेले काम कौतुकास्पद आहे. गरजू लोकांपर्यंत पोहोचून योग्य वेळी योग्य मदत करणारी संस्था म्हणून आपुलकी सर्वांना परिचित होत आहे. या संस्थेकडून पुढील काळात समाजसेवेचे असेच भरीव कार्य व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
लोकार्पण कार्यक्रमासाठी आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, अजयकुमार बाबर, सोमनाथ माळी, सोमनाथ सपाटे, महादेव बोराळकर, शशिकांत येलपले, अतुल वाघमोडे, अरविंद केदार, दीपक शिनगारे, प्रा. रमेश बुगड, प्रा. विधिन कांबळे, दत्तात्रय नवले, राहुल टकले, सुरेशकाका चौगुले, अरविंद डोंबे, दत्तात्रय खटकाळे, रमेश गोडसे, रमेशअण्णा देशपांडे, वसंत माने, रविंद्र कदम आदी आपुलकी सदस्यांसह अस्तित्वचे संकल्प गडहिरे, खंडेराव लांडगे आदी उपस्थित होते.
आपुलकी प्रतिष्ठान कडे सध्या ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन व ५ हॉस्पिटल बेड रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ऑक्सीजन मशीन व बेड नाममात्र शुल्क घेऊन गरजू रुग्णांना भाड्याने वापरण्यासाठी दिले जातात. तेव्हा गरजू रुग्णांनी आपुलकीचे सचिव संतोष महिमकर, मो. नं 76206 57112 वर संपर्क साधावा.
- राजेंद्र यादव, अध्यक्ष -आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला.